मंगळवार, १४ एप्रिल, २००९

एका मताचं मोल

भारतातल्या कोट्यावधी मतदारांपैकी सर्वात भाग्यवान मतदार जर कोण असेल तर ते आहेत भारतदास दर्शनदास त्याला कारणही तसचं आहे कारण त्यांना मतदानासाठी रांगेत उभं राहावं लागणार नाहीये. त्यांच्या एकट्यासाठी स्वतंत्र मतदानाची सोय करण्यात आलीयं. पुजारी असलेले भारतदास दर्शनदास हे गुजरातच्या अतीदुर्गम भागातील गीरच्या वाघांच्या अभयअरण्यात वास्तव्य करतात. त्यांना मतदान करता यावं याकरता तब्बल तीन निवडणूक अधिकारी आणि दोन पोलीस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसह रवाना होणार आहेत. त्याकरता त्यांना नदी आणि वाळवंट पार करण्याचं दिव्य करावं लागणार आहे. गेली एक दशक ते जंगलातल्या एका छोट्या मंदिरात वास्तव्य करत आहेत. तिथे विजेची तसचं पाण्याची आणि आरोग्य सूविधा नसल्याबाबत त्यांची तक्रार आहे. ते म्हणतात जवळच्या गावात पोहचायला त्यांना तब्बल दोन तास पायपीट करावी लागते. काही वेळा त्यांच्या घराबाहेर वाघ येऊन मुक्काम ठोकतात अशावेळेस ते जाईपर्यंत प्रतिक्षा करावी लागते असंही त्यांनी सांगितलं. गिर अभयाअरण्यातील मंदिराला भेट देणाऱ्या भक्तांच्या दानावर ते आपला उदरनिर्वाह करतात. गिरचं अभयअरण्य १४०० स्केवअर मीटर प्रदेशावर पसरलेलं आहे. या संरक्षित जंगलात वास्तव्य करणारे मालधारी आदिवासी त्यांना खायला देतात. पण त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत वाद असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये. मालधारी आदिवासींच्या मुलांना धार्मिक ग्रंथांतील शिकवण देतात. रेडिओवरील बातम्या ऐकून ते देशातील घडामोडींची माहिती ठेवतात. माझ्या एका मताला फारशी किंमत नसल्यानेच आजवर कुणीही राजकारणी आपल्या भेटीस आलं नसल्याचं सांगताना देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्या विषयीचा निर्धारही ते व्यक्त करतात.