शनिवार, १४ मार्च, २००९

मायानगरीतले राजकारणी

चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांनी जनमानसावर असलेल्या गारुडाचं वापर करत राजकारणात पहिल्यांदा प्रवेश केला तो दक्षिण भारतात. एम.जी.रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललितांनी लोकांच्या हृदयावर अधिराज्य तर गाजवलचं पण राजकारणात सत्तारुढ होत ते राज्यकर्तेही झाले. आता हे लोण फक्त दक्षिण भारतापूरतं मर्यादीत न राहता संपूर्ण देशभर पसरलं आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये राजकारणात सक्रिय असलेल्या फिल्मी तारा तारकांचा हा लेखाजोखा.
चिरंजीवी
आंध्र प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीत मेगा स्टार चिरंजीवी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. चिरंजीवीने प्रजा राज्यम पक्षाची स्थापना केलीय. मागील वर्षी त्याने तिरुपती येथे नव्या पक्षाची घोषणा केली होती तिथूनच तो निवडणूक लढवणार आहे. चिरंजीवीसोबतच त्याचा धाकटा भाऊ पवन कल्याण स्टार कॅम्पेनर असणार आहे. तर त्याचा दुसरा भाऊ नागेंद्र बाबू निवडून येण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघात रणनीती आखणार आहे. चिरंजीवी सध्या रोड शोज आणि जाहीर सभांमध्ये व्यस्त आहे.

तेलगु जनता ज्यांना दैवतासमान मानते त्या एन.टी.रामाराव यांचे चिरंजीव नंदमुरी बाळकृष्ण यांची लोकप्रियता चिरंजीवी एवढीच आहे. तेलगु देसमचे अध्यक्ष एन.चंद्रबाबू नायडू आणि एनटीआर घराण्याला जोडणारा दुवा म्हणजे नंदमुरी बाळकृष्ण. एनटी रामाराव यांच्या विरोधात नायडुंनी बंड केल्यानंतर बाळकृष्ण आणि त्यांच्यात वितुष्ट आलं. पण आता नायडुंनी परत एकदा बाळकष्ण यांच्या बरोबर जुळुन घेतलं आहे.

आता तेलगु देसमसाठी एनटीआर ज्युनिअर आणि तारका रत्न प्रचार करणार आहेत. नंदमुरी बाळकृष्ण आगामी लोकसभा लढवणार आहेत.

जयसुधा
सत्तर आणि ऐशींच्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जयसुधाने गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयसुधांमुळे काँग्रेसच्या प्रचाराला ग्लॅमरची झळाली लाभली. यावळेस त्यांना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जयसुधा राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांनी प्रजा राज्यमच्या पवन कल्याणला असंसदीय भाषा वापरल्याबद्दल धारेवर धरलं.

विजयाशांती
किरण बेदींच्या आयुष्यावर आधारीत सुपरहिट तेलगु सिनेमा कर्तव्यमची नायिका विजयशांतीने 1997 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. आता ती तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात आहे. विजयशांतीनं आपला तल्ली तेलंगणा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीत विलीन केल्यानंतर, तिची महासचिव म्हणून नेमणूक करण्यात आलीय. लोकसभेसाठी विजयशांती रिंगणात असण्याची शक्यता आहे.

रोजा सेल्वामणी
तेलगु देसमच्या महिला आघाडीची प्रमुख असलेली सेल्वामणी हे एक वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. नुकतीच तिने दुसऱ्या राजकीय पक्षात असलेल्या सिनेतारकांवर शेरेबाजी करुन वाद ओढवून घेतला होता.

तिने काँग्रेसतर्फे 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यात ती पराभूत झाली. आता ती परत एकदा नशीब आजमावणार आहे.

महाराष्ट्र

हेमामालिनी हिंदी चित्रपटसृष्टीतली सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री. सध्या भाजपतर्फे राज्यसभेवर आहे. हेमामालिनी प्रचारात आघाडीवर राहणार आहेत.
स्मृती इराणी
क्योंकि सांस भी कभी बहू थी मालिकेमुळे तुलसी साकारणारी स्मृती इराणी घराघरात पोहचली. सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढण्यासाठी त्यांचही नावं चर्चेत आहे. तसंच बडोद्यातूनही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

गोविंदा
मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडून आलेला गोविंदा सर्वात निष्क्रीय खासदार म्हणून ओळखला जात असला तरी पुन्हा लढण्याची त्याची इच्छा आहे.

होळीच्या दिवशी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्याला नोटीस जारी केली आहे.

नग्मा
काँग्रेसकडून नग्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मुंबई किंवा उत्तर प्रदेशातनं ती निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे.

पश्चिम बंगाल

ममता बॅनर्जीने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी बंगालमधील सुपरस्टार माधवी मुखर्जी आणि नारायण दास यांचा उपयोग प्रचारात करु घेतला होता.

तपस पॉल
तपस पॉल गेली तीन दशकं बंगालमधील सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. कृष्णनगर मतदासंघांसाठी त्याच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. तपस पॉल कोलकत्त्यातल्या अलीपूर विधानसभा मतदारसंघातून लागोपाठ दोनदा निवडून आलाय. आता ते कृष्णनगर जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

शताब्दी रॉय
समीक्षकांनी गौरवलेली शताब्दी रॉय ही गुणी अभिनेत्री आता बिरभूम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पंचवीस वर्षाहून अधिक काळ टॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी शताब्दी ऱॉय राजकारणात यशस्वी होते का ते पाहायचं.

तमिळ फिल्म इंडस्ट्रीने तमिळ राजकारणावर अधिराज्य गाजवलं आहे. एमजी रामचंद्रन, जयललिता आणि करुणानिधींनी सिनेमा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात असामान्य कामगिरी करुन दाखवली आहे.

शरतकुमार

शंभरहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या शरतकुमारची राजकीय कारकिर्दीनेही नाट्यमय वळणं घेतली आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम मध्ये त्यानं 1988 साली प्रवेश केला पण तो फार काळ या पक्षात राहू शकला नाही. शरतकुमार आणि त्याची पत्नी राधिका या दोघांनी 2006 साली DMKला सोडचिठ्ठी दिली आणि AIADMKमध्ये दाखल झाले. पण AIADMKला सत्ता काबीज करता आली नाही आणि त्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवल्याबद्दल राधिकाला AIADMKने बाहेरचा रस्ता दाखवला. शरत कुमारनेही लवकरच बाहेर पडत AISMK पक्षाची स्थापना केली आणि जानेवारी महिन्यात तिरुमंगलम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तो पराभूत झाला. आता तो किंवा त्याची पत्नी नाडर बहुल मतदारसंघातून परत एकदा नशीब आजमावणार असल्याची बातमी आहे.

नेपोलियन
नेपोलियनने देखील 100 हून अधिक चित्रपटात काम केलं आहे आणि तो एक प्रथितयश व्यवसायिक देखील आहे. त्यानं डीएमके तर्फे 2001 साली निवडणूक लढवली आणि जिंकला. पण त्याला 2006 सालच्या निवडणुकीत एस.व्ही.शेखर या चित्रपट आणि नाटक क्षेत्रातल्या दिग्गजाकडून पराभव पत्करावा लागला. सध्या राजकारणात नेपोलियन फारसा सक्रीय नाही पण तरीही संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्या नावाची चर्चा आहे.

जे.के.रितेश

नवोदित रितेशच्या नावावर फक्त दोनच चित्रपट असले तरी त्याचे आजोबा सूबा तंगवेलन हे सध्याच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री आहेत. तसंच करुणानिधींचे मोठे चिरंजीव एम.के. अळगिरी यांचा तो समर्थक आहे ही त्याची आणखी एक जमेची बाजू. मदूराईवर अळगिरीचं वर्चस्व आहे.

उत्तर भारतीय चित्रसृष्टी

मनोज तिवारी

एकेकाळी गावच्या रामलीलांमध्ये भूमिका करणारा मनोज तिवारी हा आजचा सर्वात मोठा भोजपुरी स्टार आहे. जौनपूरमधून सपाच्या तिकिटावर तो निवडणूक लढणार आहे. मनोज तिवारी हा चांगला गायक असून त्याच्या काही कॅसेट्सही बाजारात उपलब्ध आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने मनोज तिवारीला तिकिट देऊ केलं होतं पण त्यानं ते नाकारलं. मनोज तिवारीला प्रचंड फॅन फोलोइंग आहे

रवीकिशन
हा आणखी एक भोजपुरी स्टार. त्याला काँग्रेसकडून तिकीटाची अपेक्षा आहे. एकेकाळी त्याचं नाव नग्मा सोबत जोडलं गेलं होतं. नग्माही काँग्रेसक़डून लढण्याची शक्यता आहे. मी यश आणि किर्ती संपादन केली आहे आता माझ्या लोकांसाठी मला काही तरी करायचं आहे असं रवीकिशन म्हणतो. या प्रतिक्रियेवरुन तो उत्तम राजकारणी होईल यात शंका नाही.

राज बब्बर
समाजवादी पक्षातर्फे आग्रा मतदारसंघातून लोकसभा गाठलेला राज बब्बर आता काँग्रेसच्या तंबूत दाखल झाला आहे. आगामी निवडणूक तो फतेहपूर सिक्रीतनं लढवणार आहे.

संजय दत्त
अनेकदा वादग्रस्त ठरुन टाडात जेलची हवा खाऊन तरीही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेला संजय दत्त आता समाजवादी पक्षातर्फे लखनौतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

जयाप्रदा
जयाप्रदाने आठ भाषांमधल्या 300 चित्रपटात काम केलं आहे. तेलगु आणि हिंदी सुपरस्टार असलेल्या जयाप्रदाचं हिंदी यथातथा असताना ती चक्क उत्तरप्रदेशातनं निवडून आली. जयाप्रदा तेलगु देसमच्या माध्यमातून राजकारणात आली. पण एन टी रामाराव यांच्या विधवा पत्नी लक्ष्मी पार्वती यांच्या बरोबर झालेल्या वादामुळे तिने समाजवादी पक्षात प्रवेश केला.

उत्तरप्रदेशातल्या रामपूर मतदारसंघात रामपूर राजघराण्याच्या नूरबानो यांचा पराभव करत तिनं लोकसभा गाठली. आता ती परत एकदा तिथूनच नशीब आजमावणार आहे.

गुरुवार, १२ मार्च, २००९

शिवसेना भाजपाचा तिढा संपला, युती कायम


''टू बी ऑर नॉट टू बी''अशा गर्तेत सापडलेली शिवसेना-भाजपाची युती अखेर होणारच अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यापासूनच शिवसेना-भाजपाच्या युतीवर अनिश्चिततेचे ढग दाटू लागले होते, पण जागावाटपावरून चालू झालेल्या''तुम्हाला-आम्हाला''नाट्यावर अखेर रात्री उशीरा पडदा पडला आणि 22-26 जागांच्या सेना-भाजपा युतीच्या पारंपरिक फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या काही दिवसात सेना भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका ,आव्हान-प्रतिआव्हानांची आतिषबाजी केल्यामुळे ''कमळाबाई''आणि''वाघोबा''यांच्यात काडीमोड होऊन संसार मोडतोय की काय अशा अटकळी राजकीय गोटात बांधल्या गेल्या होत्या पण त्या अटकळींना आता पूर्णविराम मिळालाय. त्यामुळं घड्याळबाईंना गॅलरीत डोळा मारण्याच्या आणि कमळाबाईंनी गुजरातच्या काकांचा सल्ला घेऊन पुढील वाटचाल स्वतंत्रपणे करण्याच्या ऊत आलेल्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळालाय. दरम्यान कळीचा मुद्दा ठरलेली कल्याणची जागा राखण्यात मात्र शिवसेनेला यश मिळाल्याची माहिती विशा्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे

डाव्या आघाडीचे महाराष्ट्रातील 6 उमेदवार जाहीर


युती आणि आघाडीचा जागावाटपाचा घोळ अजूनही सुरू असताना डाव्या आघाडीनं महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांचा युतीवरून आणि जागावाटपावरून चर्चा-टीका , आव्हान-प्रतिआव्हानांचा फड रंगला असताना डाव्या आघाडीनं मात्र राज्यातल्या लोकसभेच्या 6 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर करून राजकीय घोडं दामटलं. पालघर, दिंडोरी, भंडारा, चिमूर, हातकणंगले आणि दक्षिण मुंबईतील उमेदवारांची यादी आज डाव्या आघाडीनं जाहीर केली. पालघरमधून माकपचे माजी खासदार लहानू शिडवा कोम तर दिंडोरीतून विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांना उमेदवारी देण्यात आलीय. भंडारा-गोंदियातून भाकपाच्या शिवकुमार गणबीर यांना, तर चिमूरमधून जनता दलाच्या प्राध्यापक नामदेव कन्नाके यांची उमेदवारी जाहीर झालीये. हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे दक्षिण मुंबई मतदारसंघातून जनता दलाच्या प्राध्यापक अवधूत भिसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची भाऊगर्दी


नॅशनल इलेक्शन वॉच या कृतिगटाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची माहिती जाहीर केलीय. नॅशनल इलेक्शन वॉचने आजच ताजी आकडेवारी जारी केलीय. राजकीय पक्षांनी फक्त निवडून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर उमेदवाराची निवड केलीय. अर्थान अजून राजकीय पक्षांकडून नॅशनल इलेक्शन वॉचला अधिकृत उमेदवारांची यादी देण्यात आलेली नाही, मात्र प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या नावांवरून एडीआरने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचा शोध घेतलाय. त्यासाठी या उमेदवारांनी मागील निवडणुकीत दाखल केलेल्या ऍफिडेविटचा आधार घेण्यात आलाय. बीएसपीने उत्तर प्रदेशसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. हे तीनही उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. ही माहिती त्यांच्या आधीच्याच ऍफिडेविटवरूनच जमा करण्यात आलीय. गुजरात, छत्तीसगड आणि दादरा नगर हवेलीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या 19 जणांच्या यादीमध्ये दोन उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर सीपीएमच्या 59 उमेदवारांपैकी 2 जणांवर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या 46 उमेदवारांपैकी तीन उमेदवारांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे आहेत. भाजपने यापूर्वी जाहीर केलेल्या 92 उमेदवारांच्या यादीमध्ये आठ जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर समाजवादी पार्टीच्या 53 उमेदवारांपैकी सहा जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या आणखी वाढू शकते, कारण जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांची ऍफिडेविट अजून नॅशनल इलेक्शन वॉचकडे आलेली नाहीत. काही राजकीय पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्या असल्या तरी त्यांनी अजून उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. म्हणूनच त्यांची यावेळची ताजी ऍफिडेविट्स उपलब्ध झालेली नाहीत. नॅशनल इलेक्शन वॉच म्हणजेच NEW (न्यू) या देशव्यापी मोहिमेत भारतातल्या 1200 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. न्यू ने आज जारी केलेल्या बीएसपी, बीजेपी, काँग्रेस, सीपीएम, सीपीआय आणि सपा असे सर्वच पक्षांचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अशा सर्व उमेदवारांची नावे आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्हेगारी खटल्यांची माहिती त्यातल्या कलमांसह न्यू या कृतिगटाने जारी केलीय.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस तृणमुल युती


देशातील राष्ट्रीय पक्ष समजल्या जाणाऱ्या काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षापासून सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला टक्कर देण्यासाठी तृणुमुलशी य़ुती केली आहे. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांपैकी 14 जागा काँग्रेस लढवणार असल्याचं काँग्रेस नेते केशव राव यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावर मतदार आपला रोष कम्युनिस्ट पक्षावर काढतील अशी आशा काँग्रेसला आहे. पश्चिम बंगालमध्ये वर्षानुवर्षे कम्युनिस्ट पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांच्या संतापाचा सामना आता खुद्द कम्युनिस्ट पक्षाला करावा लागणार आहे. म्हणून जमीन अधिग्रहणाचा मुद्दा लावून धरणाऱ्या तृणुमुल काँग्रेससोबत काँग्रेसने युती केली आहे.तृणुमुल काँग्रेस हा पश्चिम बंगालमध्ये प्रमुख विरोधी पक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर तिसरी आघाडीत फूट- भाजप


लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्या आघाडीत फुट पडून तिसरी आघाडी संपुष्टात येईल असं भाजपनं म्हटलं आहे.तिसरी आघाडी फक्त पक्षाची शक्ती वाढवण्यास कामात येऊ शकते. स्वबळावर तिसरी आघाडी केंद्रात सरकार स्थापन करूच शकणार नसल्याचही भाजपचे राष्ट्रीय सचिव एस. तिरूनावुकरासर यांनी चेन्नईत म्हटलं आहे.काँग्रेस किंवा भाजपला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी तिसरी आघाडी भूमिका बजाऊ शकते असंही भाजपचे राष्ट्रीय सचिव एस. तिरूनावुकरासर यांनी म्हटलं आहे. भाजपचं समविचारी पक्षांशी तामिळनाडूत युती करण्यासंबंधी चर्चा सुरू असल्याचही त्यांनी सांगितलं.

भाजप-सेना युतीचा जागावाटपाचा वाद कायम


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना युतीच्या जागावाटपासंदर्भात सुंदोपसुंदी सुरूच आहे.भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपावर आजच्या बैठकीत निर्णय होवू शकलेला नाही. भाजप-सेना युती संदर्भातल्या बैठकीत भाजपकडून भाजप प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे तसेच विनोद तावडे हे उपस्थित होते. तर शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते मनोहर जोशी तर नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले जळगावचे सुरेश जैन हे ही उपस्थित होते.