सोमवार, २७ एप्रिल, २००९

मनसेचा महेश जेठमलानींवर आरोप


ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी काल राज ठाकरेंवर भडकले. जेठमलानी हे अफजल गुरूची वकिली करत असल्याचा आरोप राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून करत असल्यानं जेठमलानींनी राज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली. जेठमलानी यांनी यासंदर्भात राज ठाकरेंना नोटीस पाठवून राज ठाकरे यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. राज ठाकरे हे एक बेजबाबदार नेते आहेत, असे वक्तव्य त्यांनी स्टार माझाशी बोलताना केलेच. पण त्याचबरोबर, माझ्यावर खोटेनाटे आरोप करणं राज ठाकरे यांना महागात पडेल, असा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत.
भाजप शिवसेनेचे राज्यसभेतले माजी खासदार राम जेठमलानी यांनी राज ठाकरेंवर खोटा प्रचार केल्याचा आरोप केल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. उत्तर मध्य मुंबईतले भाजपचे उमेदवार महेश जेठमलानी यांच्या विरूद्ध,
मुंबई उपनगराचे निवडणूक अधिकारी विश्वास पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे., धर्माचा आधार घेऊन प्रचार केल्याचा आरोप महेश जेठमलानी यांच्यावर करण्यात आला आहे. त्यासाठी पुरावा म्हणून महेश जेठमलानींचे वडिल राम जेठमलानी यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या ख्रिश्चन मतदारांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे