
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी आज पश्चिम बंगालमधल्या प्रचार सभेत डाव्या आघाडीवर हल्लाबो केला. डावी आघाडी पश्चिम बंगालमध्ये हुकूमशाही राबवत आहे, आणि त्यामुळे तिथे गरीब आणि अल्पसंख्याकांचा विकास होऊ शकलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या एका दुर्गम खेड्यातल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. डाव्या आघाडीच्या अनास्थेमुळेच पश्चिम बंगालमधल्या लाखो गरीबांना राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड मिळू शकली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला एकमेव मुस्लीम बहुल जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातल्या प्रचारसभेत सोनिया गांधींनी यूपीए सरकारने अल्पसंख्याकांसाठी केलेल्या प्रचारसभेचा पाढा वाचला. सिंगूर आणि नंदिग्राम मधल्या हिंसाचाराचा उल्लेख करत त्यांनी डाव्या आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली. डाव्या आघाडीचे नेते स्वतःला गरीब, शेतकरी आणि कामगार वर्गाचे वाली म्हणवून घेतात, मात्र स्वतःच्याच जमीनीचं रक्षण करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करतात, या लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन जमिनीवर उतरणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना लाठीचा मार खावा लागला असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्शिदाबादच्याच जांगीपूर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही आपल्या भाषणात डाव्या आघाडीवर लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही राबवत असल्याचा आरोप केला. या जाहीर सभेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचंही भाषण झालं. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांची पश्चिम बंगालमध्ये युती आहे. गेल्या 30 पेक्षा जास्त वर्षाहून राज्यात डावी आघाडी सत्तेत आहे, या 30 वर्षांच्या काळातही डाव्या आघाडीला राज्यातल्या गरीब आणि अल्पसंख्यांकाचे प्रश्न सोडवता आले नाहीत. आपल्या 12 मिनिटांच्या हिंदी भाषणातून सोनिया गांधींनी राज्यातल्या डाव्या आघाडीवर कडाडून टीका करतानाच केंद्र सरकारने पश्चिम बंगालसाठी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. डाव्या आघाडीने केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची राज्यात अंमलबजावणी करताना फक्त नेत्यांचाच विचार केला, सामान्य लोकांचा नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.