लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या होत आहे. राजकारणातील अनेक रथीमहारथींचे भवितव्य पणाला लागलेलं आहे. उद्या मतदारराजा आपला कौल देईल. देशभरातल्या प्रमुख लढतींमध्ये आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे भाऊ वाय.एस.जगमोहन रेड्डी हे कडापामधून रिंगणात आहे. कर्नाटकात दक्षिण बंगलोरमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार लढतीत आहेत तर बंगलोर ग्रामीण मध्ये भूतपूर्व पंतप्रधान देवेगौडा यांचे चिंरजीव एच.डी.कुमारस्वामी आपलं नशीब आजमावत आहेत त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या तेजस्वीनी गौडा. गुलबर्गात काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जून खर्गे निवडणूक लढवत आहेत. तर बंगलोर उत्तर मध्ये काँग्रेसचे वयोवृध्द नेते माजी रेल्वे मंत्री सी.के.जाफर शरीफ, उत्तर कन्नाडात काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा आणि भाजपाचे अनंतकुमार हेगडे यांच्यात लढत आहे. अल्वांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलांना तिकिट न दिल्याने हायकमांडवर टीका केली होती.
उत्तर प्रदेशात अमेठीत राहुल गांधी आणि भाजपाचे आर.बी.सिंग यांच्यात सामना आहे. तर आंबेडकर नगरमध्ये भाजपाचे विनय कटियार मतदारांना सामोरं जात आहेत. प्रतापगड मध्ये तिरंगी लढतीत अपना दलाचे आतिक अहमद, काँग्रेसच्या राणी रत्ना सिंग आणि सपाचे अक्षय प्रताप सिंग आपलं नशीब आजमावत आहेत.
बिहारमध्ये हाजीपूर मध्ये रामविलास पासवान, मुझफ्फरपूर मध्ये साथी जॉर्ज फर्नांडीस आपल्या आयुष्यातली अखेरची निवडणूक लढवत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी फर्नांडीसांचे शिष्य त्यांना सोडून गेल्याने एकाकी लढत देण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपलीय. वैशालीत केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग, मधूबनीत केंद्रीय गृह राज्य मंत्री शकील अहमद आणि भाजपाच्या हुकुमदेव नारायण यादव यांच्यात लढत आहे. पश्चिम चंपारणमध्ये लोक जनशक्तीच्या तिकिटावर सिने दिग्दर्शक प्रकाश झा आणि राजदचे साधु यादव यांच्यात प्रेक्षणीय लढत आहे.
मध्यप्रदेशातही अनेक दिग्गज उद्या मतदारांना सामोरे जातील त्यात छिंदवाड्यात कमलनाथ, रिवात भाजपाचे चंद्रमणी त्रिपाठी आणि सिधीत अर्जून सिंग यांच्या कन्या बंडखोर उमेदवार वीणा सिंग लढतीत आहेत.
झारखंडमध्ये जमशेदपूरमध्ये अर्जून मूंडा आणि शैलेंद्र माहतो यांच्यात सामना आहे. दुमरात शिबू सोरेन आपलं नशीब आहेत. सोरेन विधानसभेच्या पोटनिवडणूकीत पराभूत झाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं होत. सिंगभूममधून माजी मुख्यमंत्री मधू कोडा निवडणूक लढवत आहेत.