सोमवार, २७ एप्रिल, २००९

प.बंगालमध्ये डावे हुकूमशाही राबवत असल्याचा सोनियांचा आरोप



काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी आज पश्चिम बंगालमधल्या प्रचार सभेत डाव्या आघाडीवर हल्लाबो केला. डावी आघाडी पश्चिम बंगालमध्ये हुकूमशाही राबवत आहे, आणि त्यामुळे तिथे गरीब आणि अल्पसंख्याकांचा विकास होऊ शकलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या एका दुर्गम खेड्यातल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. डाव्या आघाडीच्या अनास्थेमुळेच पश्चिम बंगालमधल्या लाखो गरीबांना राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड मिळू शकली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला एकमेव मुस्लीम बहुल जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातल्या प्रचारसभेत सोनिया गांधींनी यूपीए सरकारने अल्पसंख्याकांसाठी केलेल्या प्रचारसभेचा पाढा वाचला. सिंगूर आणि नंदिग्राम मधल्या हिंसाचाराचा उल्लेख करत त्यांनी डाव्या आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली. डाव्या आघाडीचे नेते स्वतःला गरीब, शेतकरी आणि कामगार वर्गाचे वाली म्हणवून घेतात, मात्र स्वतःच्याच जमीनीचं रक्षण करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करतात, या लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन जमिनीवर उतरणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना लाठीचा मार खावा लागला असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्शिदाबादच्याच जांगीपूर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही आपल्या भाषणात डाव्या आघाडीवर लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही राबवत असल्याचा आरोप केला. या जाहीर सभेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचंही भाषण झालं. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांची पश्चिम बंगालमध्ये युती आहे. गेल्या 30 पेक्षा जास्त वर्षाहून राज्यात डावी आघाडी सत्तेत आहे, या 30 वर्षांच्या काळातही डाव्या आघाडीला राज्यातल्या गरीब आणि अल्पसंख्यांकाचे प्रश्न सोडवता आले नाहीत. आपल्या 12 मिनिटांच्या हिंदी भाषणातून सोनिया गांधींनी राज्यातल्या डाव्या आघाडीवर कडाडून टीका करतानाच केंद्र सरकारने पश्चिम बंगालसाठी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. डाव्या आघाडीने केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची राज्यात अंमलबजावणी करताना फक्त नेत्यांचाच विचार केला, सामान्य लोकांचा नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. देशभरातील एकशे एक्केचाळीस मतदारसंघात आज मतदान होत आहे. तर राज्यातील पंचवीस मतदारसंघातही आज मतदान होत आहे. या पंचवीस मतदारसंघामधून राज्यातील तसचं केंद्रातील दिग्गज नेतेही निवडणूक लढवताहेत. त्यामुळे आज या दिग्गज नेत्यांचही भवितव्य इलेक्ट्रॉनिक मशीन्समध्ये बंद होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बुधवार, २२ एप्रिल, २००९

देशभरातल्या प्रमुख लढती

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या होत आहे. राजकारणातील अनेक रथीमहारथींचे भवितव्य पणाला लागलेलं आहे. उद्या मतदारराजा आपला कौल देईल. देशभरातल्या प्रमुख लढतींमध्ये आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे भाऊ वाय.एस.जगमोहन रेड्डी हे कडापामधून रिंगणात आहे. कर्नाटकात दक्षिण बंगलोरमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार लढतीत आहेत तर बंगलोर ग्रामीण मध्ये भूतपूर्व पंतप्रधान देवेगौडा यांचे चिंरजीव एच.डी.कुमारस्वामी आपलं नशीब आजमावत आहेत त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या तेजस्वीनी गौडा. गुलबर्गात काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जून खर्गे निवडणूक लढवत आहेत. तर बंगलोर उत्तर मध्ये काँग्रेसचे वयोवृध्द नेते माजी रेल्वे मंत्री सी.के.जाफर शरीफ, उत्तर कन्नाडात काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा आणि भाजपाचे अनंतकुमार हेगडे यांच्यात लढत आहे. अल्वांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलांना तिकिट न दिल्याने हायकमांडवर टीका केली होती.
उत्तर प्रदेशात अमेठीत राहुल गांधी आणि भाजपाचे आर.बी.सिंग यांच्यात सामना आहे. तर आंबेडकर नगरमध्ये भाजपाचे विनय कटियार मतदारांना सामोरं जात आहेत. प्रतापगड मध्ये तिरंगी लढतीत अपना दलाचे आतिक अहमद, काँग्रेसच्या राणी रत्ना सिंग आणि सपाचे अक्षय प्रताप सिंग आपलं नशीब आजमावत आहेत.
बिहारमध्ये हाजीपूर मध्ये रामविलास पासवान, मुझफ्फरपूर मध्ये साथी जॉर्ज फर्नांडीस आपल्या आयुष्यातली अखेरची निवडणूक लढवत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी फर्नांडीसांचे शिष्य त्यांना सोडून गेल्याने एकाकी लढत देण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपलीय. वैशालीत केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग, मधूबनीत केंद्रीय गृह राज्य मंत्री शकील अहमद आणि भाजपाच्या हुकुमदेव नारायण यादव यांच्यात लढत आहे. पश्चिम चंपारणमध्ये लोक जनशक्तीच्या तिकिटावर सिने दिग्दर्शक प्रकाश झा आणि राजदचे साधु यादव यांच्यात प्रेक्षणीय लढत आहे.
मध्यप्रदेशातही अनेक दिग्गज उद्या मतदारांना सामोरे जातील त्यात छिंदवाड्यात कमलनाथ, रिवात भाजपाचे चंद्रमणी त्रिपाठी आणि सिधीत अर्जून सिंग यांच्या कन्या बंडखोर उमेदवार वीणा सिंग लढतीत आहेत.
झारखंडमध्ये जमशेदपूरमध्ये अर्जून मूंडा आणि शैलेंद्र माहतो यांच्यात सामना आहे. दुमरात शिबू सोरेन आपलं नशीब आहेत. सोरेन विधानसभेच्या पोटनिवडणूकीत पराभूत झाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं होत. सिंगभूममधून माजी मुख्यमंत्री मधू कोडा निवडणूक लढवत आहेत.

सोमवार, २० एप्रिल, २००९

आजची फेकाफेकी

प्रचाराच्या तोफा..

दुसऱया टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. राज्यातील पंचवीस लोकसभा मतदारसंघात तेवीस तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळं या पंचवीस मतदारसंघातील
जाहीर प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानात राज्यातील जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, दिंडोरी, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती, पुणे, मावळ, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.
निवडणूकीच्या या टप्प्यात शरद पवार, ए आर अंतुले, सुप्रिया सुळे, सुरेश कलमाडी. समीर भुजबळ, गोपीनाथ मुंडे, सुरेश प्रभु रामदास आठवले या दिग्गजांच भवितव्य ठरणार आहे.
त्यामुळं या मतदारसंघातील प्रचाराची राळ आज थांबणार आहे. राज्य आणि केंद्रातील अनेक दिग्गज नेते या मतदारसंघातून निवडणूक लढवताहेत.

रविवार, १९ एप्रिल, २००९

कसाबचं रेशनकार्ड राज ठाकरेंच्या सभेत

राहुल पंढरपुरात तर पवार सांगोल्यात


राजकारणातलं वजन सभेत गर्दी खेचण्यासाठी किती उपयोगाचं पडतं हे आज सोलापुरात पहायला मिळालं. सोलापूर जिल्हयात आज दोन दिग्गजांच्या सभा आहेत. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांची आज पंढरपुरात तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सभा सांगोल्यात आहे. पण पवारांच्या सभेत जनसागर लोटल्याचं दिसतंय. पण पंढरपुरात मात्र चित्र वेगळंच आहे. राहुल गांधी यांच्या सभेला मात्र हजारभरही लोक नाहीत. एक तर टळटळीत दुपारची वेळ आणि राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी घेतलेली खबरदारी. पंढरपुरातल्या सभेतल्या लोकांकडून पोलिसांनी ओळखपत्र मागितली. त्यामुळे झालं असं की लोक या सभेला थांबलेच नाहीत. त्या उलट पवारांच्या सभेला मात्र तुफान गर्दी झालीये.