गुरुवार, १२ मार्च, २००९

डाव्या आघाडीचे महाराष्ट्रातील 6 उमेदवार जाहीर


युती आणि आघाडीचा जागावाटपाचा घोळ अजूनही सुरू असताना डाव्या आघाडीनं महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांचा युतीवरून आणि जागावाटपावरून चर्चा-टीका , आव्हान-प्रतिआव्हानांचा फड रंगला असताना डाव्या आघाडीनं मात्र राज्यातल्या लोकसभेच्या 6 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर करून राजकीय घोडं दामटलं. पालघर, दिंडोरी, भंडारा, चिमूर, हातकणंगले आणि दक्षिण मुंबईतील उमेदवारांची यादी आज डाव्या आघाडीनं जाहीर केली. पालघरमधून माकपचे माजी खासदार लहानू शिडवा कोम तर दिंडोरीतून विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांना उमेदवारी देण्यात आलीय. भंडारा-गोंदियातून भाकपाच्या शिवकुमार गणबीर यांना, तर चिमूरमधून जनता दलाच्या प्राध्यापक नामदेव कन्नाके यांची उमेदवारी जाहीर झालीये. हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे दक्षिण मुंबई मतदारसंघातून जनता दलाच्या प्राध्यापक अवधूत भिसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा