रविवार, २९ मार्च, २००९

"हाता"ला कोंबडीची साथ..!

महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रचार आता कोंबडी पळालीच्या तालावर होणार आहे. जत्रा या मराठी चित्रपटातलं कोबंडी पळाली आणि तुला शिकविन चांगलाच धडा या चित्रपटातल्या डिप्पाडी डिंपांग या गाण्याच्या चालीवर प्रदेश काँग्रेस आपली प्रचाराची गाणी लिहिणार आहे. त्यासाठी लागणारे हक्क महाराष्ट्र काँग्रेसला मिळाले आहे.
काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याचा ठेका आता फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांनी घेतलाय. कारण जय हो च्या ना-यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने आता प्रचारासाठी लोकप्रिय गाण्यांचा आधार घेण्याचं निश्चित केलंय. महाराष्ट्राच्या जनतेच्या ओठावर रूळलेल्या जत्रा या सिनेमातील कोंबडी पळाली अन् तुला शिकविन चांगलाच धडा डिबाडी डिपांग या गाण्यांच्या चालीवर आता कॉंग्रेसच्या प्रचाराचे शब्द फुलणार आहेत. या गाण्यांवर आतापर्यंत अख्ख्या महाराष्ट्राने ठेका धरला तर कॉंग्रेसच्या कार्यकर्ते या गाण्यांच्या चालीवर मतांचा जोगवा मागणार आहेत.
या दोन्ही गाण्यांचे सर्वाधिकार हे व्हिडिओ पॅलेस या कंपनीकड़े आहेत. त्यांच्याकडून कॉंग्रेस पक्षाने रितसर या गाण्यांच्या चालीला मॉडिफाय करण्याच्या हक्काची गेल्या आठवड्याभरापूर्वीच मागणी करण्यात आली होती. मात्र या प्रचार मोहिमेत इतर कोणत्याही पक्षावर टीका करणारी भाषा वापरण्यात न आल्याचे पाहून व्हिडिओ पॅलेस या कंपनीने हे हक्क कॉंग्रेसपक्षाला दिल्याचे समजते.
आतापर्यंत स्लमडॉग मिलेनियर या ऑस्कर अवॉर्डवर शिक्कामोर्तब करणा-या जय हो या ख्यातनाम कवी गुल़ज़ार लिखित अन् ए आर रहमान या गाण्याचे हक्क मिळवण्यात कॉंग्रेसने पहिलटकरणीचा मान मिळवला अन् वेगळ्या धर्तीच्या प्रचाराचा फंडा या निवडणुकीच्या रिंगणात वापरत असल्याचं दाखवून दिलं. यासोबतच आता मराठमोळ्या गाण्यांच्या या निवडीने प्रादेशिक प्रचारासाठी आता हाच फॉर्म्युला नव्याने वापरण्याची क्लृप्ती कॉंग्रेसने वापरल्याची चर्चा आता मराठी संगीत अन् फिल्मी वर्तुळात रंगू लागलीय.