सोमवार, १६ मार्च, २००९

हत्तीची झाँकी, दिल्ली बाकी

उत्तर प्रदेश तो झाँकी है, दिल्ली तो बाकी है. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निर्णायक बहुमताचा चमत्कार घडविणाऱ्या बहुजन समाज पार्टीने दिलेली ही घोषणा निव्वळ घोषणा नव्हती.

गेल्या काही वर्षीत देशभरातील सर्वच राज्यांमध्ये त्यांनी अचूक रणनितीची आखणी केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या राज्यावर सत्तारूढ झाल्यानंतर मायावतींना महत्वाकांक्षा आहे ती पंतप्रधानपद मिळवण्याची.

काही वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी कांशीराम यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती पण तेव्हा त्यांनी आपल्याला पंतप्रधान व्हायचं आहे हे स्पष्ट शब्दात सांगितलं होतं.

आता त्यांच्या शिष्या त्यांचं स्वप्न पूर्णत्वास नेतील का, याचं उत्तर येणारा काळ देईल. मायावतींनी मात्र राजकीय डावपेच, आडाखे आणि व्यूहरचनेत कोणतीही कसूर ठेवलेली नाही. लोकसभा निवडणुकांसाठी बहुजन समाज पार्टी सज्ज झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतही बसपाने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात दोन प्रमुख राजकीय पक्षांनंतर राष्ट्रीय स्तरावरील पक्ष म्हणून बसपाचा उदय होत आहे.
महाराष्ट्र
बसपाने उत्तरप्रदेशातील सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगाचा पुढचा अध्याय महाराष्ट्रात लिहिण्याचं ठरविलं आहे. पक्षाने पहिली चार उमेदवारांची यादी जाहीर केली त्यातील सर्व उमेदवार ब्राह्मण समाजाचे आहेत. तसंच चारही मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्याही मोठी आहे. पण या सर्वांबरोबरच उमेदवार आर्थिक दृष्ट्याही तगडे आहेत. पुण्यातून बांधकाम क्षेत्रातले मातब्बर डी.एस.कुलकर्णी, नाशिकमधून काळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास महंत, ठाण्यातून शिपिंग व्यवसायिक ए.के.त्रिपाठी आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून पर्यावरण बचावाचा लढा देणारे डॉ.जयेंद्र परूळेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.

मुंबई (दक्षिण-मध्य) मधून अरुण गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४६ जागा बसपाने लढवल्या होत्या. तेव्हा विदर्भातल्या अकरा पैकी दहा जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभवास बसपाच्या उमेदवारांनी मोठा हातभार लावला होता.

मध्यप्रदेश
प्रत्येक मतदारसंघात उमेदवारीसाठी सात ते आठ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाल्याचं बसपाचे मध्य प्रदेश प्रमुख नारायण प्रसाद अहिरवार सांगतात. कांशीराम यांच्या काळातच बसपाने मध्यप्रदेशात हातपाय पसरले होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जरी केवळ सात जागांवर विजय मिळवता आला तरीही अकरा टक्के मत पक्षाने मिळवली.

एवढचं नव्हे तर बसपाच्या २० उमेदवारांनी ३०-३५ टक्के मतं मिळवली. पक्षाने घेतलेल्या आढाव्यानुसार राज्यातल्या १२ जागा ए कॅटेगरीत मोडतात. ए कॅटेगरी म्हणजे असे लोकसभा मतदारसंघ जिथे पक्षाने उत्तम कामगिरी बजावली आहे आणि दोन लाखांपेक्षा अधिक मतं मिळवली आहेत. मध्य प्रदेशातल्या उमेदवारांची यादी तयार असून मायावतींच्या मंजूरी मिळणं फक्त शिल्लक आहे.

राजस्थान आणि दिल्ली
बसपाची भूमिका निवडणुकीत उमेदवार पाडण्यापुरती असण्याचे दिवस सरले आहेत. राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मधील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमधल्या पक्षाच्या कामगिरीने ते सिध्द केलं आहे. आता आम्हाला काही राज्यांमध्ये जागा जिंकण्याची आशा आहे. ही प्रतिक्रिया आहे बसपाच्या एका वरिष्ठ नेत्याची. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत आठ टक्के मत आणि सहा विधानसभेच्या जागांवर पक्षाने विजय मिळवला. आता पक्षाने दोन आमदारांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

दिल्लीमध्ये सातही जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचं मुख्य लक्ष्य असेल ते दक्षिण दिल्ली, वायव्य दिल्ली आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघांवर.

पंजाब आणि हरियाणा
उत्तरप्रदेश बरोबरीनेच उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणात उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या राज्यांमध्ये पक्षाच्या भाईचारा कमिट्यांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पडली आहे, त्यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया इतक्या जलदगतीने पार पडली आहे.

पंजाबमधील १३ पैकी १२ जागांवर उमेदवारांच्या नावांना हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. त्यात माजी राज्यपाल बी. के. एन. चिब्बर यांना अमृतसरमधून, निवृत्त इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर सुरजीत सिंग यांना जालंधरमधून तसेच माजी सेशन्स जज गुरनाम सिंग सेवक अशा मातब्बरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

बिहार
बिहारमधील उमेदवारांची यादी लवकरच मायावती जाहीर करतील. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमेलगत असलेल्या प्रदेशांमध्येच बसपाची कामगिरी चांगली राहिल असं बसपाच्या नेत्याने सांगितलं.

दक्षिण भारत
कर्नाटकमधील तिसऱ्या आघाडीच्या रॅलीला पक्षाचे राष्ट्रीय सचिव सतीशचंद्र मिश्रा यांना पाठविण्याचा निर्णय मायावतींनी पूर्ण विचाराअंती घेतला होता. सर्व पर्यांयाचा विचार करुन जेव्हा आपलं स्थान बळकट आहे आणि वाटाघाटींमध्ये आपलं घोडं पुढे दामटवू शकतो याची खात्री झाल्यांनंतरच त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर दावा सांगितला योगायोगाने काशीराम यांच्या जयंतीच्या तीन दिवस अगोदरच रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मायावतींनी एका दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी आपल्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यात यावं यासाठी रॅलीची संधी अचूक साधली आणि त्याचबरोबर त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांना पक्षाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं.

दक्षिण भारतातील मतदारांमध्ये त्यांच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला. अर्थातच केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये बसपाच्या संघटनात्मक बांधणीचा तिसरा टप्पा ओलांडला आहे. मायावती केवळ लोकप्रिय नेत्याच नाहीत तर अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना नुकसान पोहचवण्याची ताकद बसपाने कमावली आहे.

केरळमधील लोकसभेच्या २० जागांपैकी १३ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. केरळमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाने १४० पैकी १०६ जागा लढवल्या होत्या आणि पक्षाने १.२४ टक्के मतं मिळवली होती. केरळमध्ये पहिल्यांदाच बसपा सर्व जागा लढवणार असल्याचं सुरेश मानसे यांनी सांगितलं. मानसे हे केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशचे प्रभारी आहेत.

कर्नाटकमध्येही पक्षाने दखल घेण्याजोगं अस्तित्व निर्माण केलं आहे. मडिगा, गोहारा आणि होलिया जातींमध्ये पक्षाने मोठं काम उभं केलं आहे. लिंगायतांमध्येही अनेक पोटजाती आहेत आणि पक्षाच्या भाईचारा कमिट्यांनी या पोटजातींमध्ये संघटना पोहचवली आहे. कर्नाटकमधील २८ जागांपैकी १५ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असल्याचं कर्नाटकचे प्रभारी वीर सिंग यांनी सांगितलं.

पक्षाने संपूर्ण भारतात हातपाय पसरले आहेत आणि लोकसभेच्या ५४३ जागांपैकी जास्तीत जास्त जागा लढवण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा