गुरुवार, १२ मार्च, २००९

निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची भाऊगर्दी


नॅशनल इलेक्शन वॉच या कृतिगटाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची माहिती जाहीर केलीय. नॅशनल इलेक्शन वॉचने आजच ताजी आकडेवारी जारी केलीय. राजकीय पक्षांनी फक्त निवडून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर उमेदवाराची निवड केलीय. अर्थान अजून राजकीय पक्षांकडून नॅशनल इलेक्शन वॉचला अधिकृत उमेदवारांची यादी देण्यात आलेली नाही, मात्र प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या नावांवरून एडीआरने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचा शोध घेतलाय. त्यासाठी या उमेदवारांनी मागील निवडणुकीत दाखल केलेल्या ऍफिडेविटचा आधार घेण्यात आलाय. बीएसपीने उत्तर प्रदेशसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. हे तीनही उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. ही माहिती त्यांच्या आधीच्याच ऍफिडेविटवरूनच जमा करण्यात आलीय. गुजरात, छत्तीसगड आणि दादरा नगर हवेलीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या 19 जणांच्या यादीमध्ये दोन उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर सीपीएमच्या 59 उमेदवारांपैकी 2 जणांवर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या 46 उमेदवारांपैकी तीन उमेदवारांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे आहेत. भाजपने यापूर्वी जाहीर केलेल्या 92 उमेदवारांच्या यादीमध्ये आठ जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर समाजवादी पार्टीच्या 53 उमेदवारांपैकी सहा जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या आणखी वाढू शकते, कारण जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांची ऍफिडेविट अजून नॅशनल इलेक्शन वॉचकडे आलेली नाहीत. काही राजकीय पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्या असल्या तरी त्यांनी अजून उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. म्हणूनच त्यांची यावेळची ताजी ऍफिडेविट्स उपलब्ध झालेली नाहीत. नॅशनल इलेक्शन वॉच म्हणजेच NEW (न्यू) या देशव्यापी मोहिमेत भारतातल्या 1200 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. न्यू ने आज जारी केलेल्या बीएसपी, बीजेपी, काँग्रेस, सीपीएम, सीपीआय आणि सपा असे सर्वच पक्षांचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अशा सर्व उमेदवारांची नावे आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्हेगारी खटल्यांची माहिती त्यातल्या कलमांसह न्यू या कृतिगटाने जारी केलीय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा