सोमवार, ९ मार्च, २००९

२००९ वर्ष निवडणुकांचं


यंदा फक्त भारतातच नाही तर तब्बल 63 देशातले लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जगभरातल्या 64 देशांमध्ये निवडणुका होत आहेत.
त्यामुळेच 2009 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखलं जाईल. एकीकडे केवळ 37,000 लोकसंख्या असलेला लेशिटेनस्टाईन, 83,000 लोकसंख्येचा अँडोरा तर दुसरीकडे 100 कोटी लोकसंख्येचा भारत निवडणुकांना सामोरं जात आहेत.
इराण, दक्षिण आफ्रिका, जपान, अफगाणिस्तान, मेक्सिको आणि पँलेस्टाईन सारख्या महत्वाच्या देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडे जगाचं लक्ष असेल.
वर्षाच्या सुरवातीलाच इस्त्रायल आणि एल साल्वादोर मध्ये निवडणुका पार पडल्या.
आफ्रिका खंडात गेली अनेक दशकं यादवीने होरपळलेल्या देशांमध्येही निवडणुका होत आहेत. त्या जर व्यवस्थित पार पडल्या आणि स्थिर राजवटी स्थापन झाल्या तर भरडून निघालेल्या लोकांना काही अंशी तरी दिलासा मिळेल.
सुदानमधल्या दारफर प्रांतातल्या दुष्काळात एका दशकात पाच लाख लोकं मृत्युमुखी पडले. त्याच्या शेजारी असलेल्या चाडमध्ये दारफर प्रांतातल्या दोन लाख लोक निर्वासितांनी आश्रय घेतलाय. चाड मध्येही निवडणुका होत आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचं वरदान आणि यादवीचा अभिशाप असलेल्या काँगोमध्येही निवडणुका होणार आहेत. काँगोतल्या हिऱ्यांच्या खाणींमुळे लक्षावधी लोकांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे.
काही देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे आणि त्यांच्या निकालांचे पडसाद जगातल्या राजकारणावरही उमटणार आहेत. इराणमधल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कट्टरपंथीय आणि मवाळवादी यांच्यातल्या संघर्षात कोण जिंकणार यावर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवुन असणार आहे.

इराकमधली जनता निव़डणुकांच्या माध्यमातून इराकी आणि अमेरिकी प्रशासनादरम्यान झालेल्या कराराचं भवितव्य निश्चित करणार आहे. अमेरिकन सैन्याचे तळ इराकी भूमीवर राहू द्यायचे किंवा नाही याचा कौल इराकी जनता देईल. त्याचप्रमाणे जगातले चौदा देश सार्वमत देखील बजावणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा