
भारतीय राज्यघटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकास मिळालेला अधिकार म्हणजे मतदानाचा. आज देशातील खेड्यापाड्यात हाच मतदानाचा एकमेव अधिकार प्रभावी हत्यारच ठरतो. परंतू जगात लोकशाहीप्रधान देश म्हणून लौकीक मिरवणाऱ्या भारताची 15 वी लोकसभा स्थापन होण्याची वेळ आली असली तरी देशातील अनेक घटक मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहिले आहेत. अद्याप मतदानाचा हक्कच पोहोचला नाही तर इतर योजना कधी पोहोचणार...अशी अवस्था आहे वाशिम जिल्ह्यातल्या पांगरी महादेव या गावची.देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना, देशभरातील नेते-कार्यकर्ते असलेल्या शक्तीनिशी रणशिंग फुंकत आहेत तर काहीजण युती-आघाड्यांचं उसनं अवसान घेऊन प्रचाराची तुतारी फुंकत आहेत. देशभर निवडणुकांचे पडघम वाजत असताना वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातल्या पांगरी महादेव गावात मात्र निवडणुकांचा साधा मागमुसही नाही. कारण इथं ना कोणाकडं मतदान करण्याचा अधिकार आहे ना कोणाकडं मतदार ओळखपत्र. 900 ची लोकसंख्या असलेलं आणि महादेवाच्या जागृत देवस्थानामुळं जिल्ह्यात प्रसिद्ध असलेलं महादेवपीर हे गाव जिल्हा प्रशासनाच्या कागदेपत्री आजही उपेक्षित आहे. तीन वर्षांपुर्वी हे गाव अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात वर्ग करण्यात आले, मात्र आजही या गावात ग्रामपंचायत, सचिव आणि ग्रामसेवकांची कार्यालये नाहीत. इतर सुविधांची वाणवा तर पाचवीलाच पुजलेली. गावाचा कारभार दोन्ही जिल्हा कार्यालयातून हाकला जात असल्याचं बोललं जातय. असं असेल तर या गावाची अवस्था पाहता 'दोन्ही घरचा पाहुना उपाशी'अशीच परिस्थिती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा