सोमवार, ९ मार्च, २००९

माढा व्हाया नांदवळमध्ये 'पॉवर'बाज उत्साह

(नवनाथ सकुंडे) साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मौजे नांदवळ गाव. गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उत्साहाचं वातावरण. गावातले पुढारी तयारीला लागलेत...साहेबांच्या जोरदार स्वागताची जय्यत तयारी...महाराष्ट्रासह राष्ट्रीय राजकारणातही आपल्याभोवती वलय निर्माण करणारे शरद पवार यंदा पहिल्यांदाच बारामती सोडून माढा मतदार संघातून लोकसभा लढवत आहेत. माढ्याचा गड सर करण्यासाठी करावयाच्या प्रचाराचा नारळ पवार आपल्या मुळ गावी नांदवळमध्ये फोडणार आहेत. प्रचाराचा श्रीगणेशा करण्याची तारीख आहे 12 मार्च...पॉवरबाज पवारसाहेब आपल्या गावात येणार म्हणून नांदवळच्या कच्चा-बच्चापासून सर्वांच्याच मनात उत्साह संचारला आहे....गावच्या पुढाऱयांपासून सर्वजण साहेबांचे स्वागत धुमधडाक्यात करण्याच्या तयारीला लागलेत.
"पवारसाहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा नादंवळात आले होते नंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडले..राष्ट्रवादी काँग्रेस काढली. केंद्रात कृषीमंत्री झाले. इतक्या वर्षानंतर साहेब गावात येताहेत त्यामुळं आम्ही गावच्या भैरवनाथ मंदिराची रंगरंगोटी करतोय. हे मंदिरही पवारसाहेबांच्याच 'कृपे'ने बांधलय." नांदवळचे सरपंच विजयकुमार शंकरराव पवार मोठ्या उत्साहात सांगतात.
12 मार्चला साहेबांच्या स्वागताची जय्यत तयारी गावकऱयांनी चालवली आहे. नांदवळकरांच्या मनाची जी अवस्था आहे तीच अवस्था माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह नागरिकांचीही आहे. शरद पवार यांनी माढामधून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर, आता तिथले स्थानिक कार्यकर्ते त्यांना विक्रमी मताधिक्यानं निवडून देण्यासाठी कामाला लागलेत.31 मार्चला ते सोलापूरमध्ये आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. राज्याचे ग्रामविकास मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर माढा मतदारसंघातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी, शेकापच्याही स्थानिक पदाधिका-यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र माढ्यात असं उत्साहाचं वातावरण असताना आ. प्रतापसिंह मोहिते पाटील मात्र पवारांच्या उमेद्वारीनं नाराज झाले असल्याची पाल राजकीय गोटात चुकचुकली... दरम्यान शरद पवारांच्या उमेदवारीला आपला सक्रीय पाठिंबा असून आपण पूर्ण ताकदीनं त्यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची भूमिका आ. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनीही घेतलीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा