लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत आणि राजकीय पक्ष युवा पिढीला साद कशी घालता येईल त्याची व्युहरचना आखत आहेत. निवडणुकीत युवा पिढीचं मतदान निर्णायक ठरणार आहे कारण एकूण मतदारांपैकी दोन तृतियांश मतदार पस्तिशीच्या आतले आहेत. पण कळीचा प्रश्न आहे की हे युवा मतदार मतदान करतील का?त्यामुळेच एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी ब्लॉग विश्वात सफर करत आहेत. तर राहुल गांधी कॉलेज कॅम्पसना भेटी देत आहेत.
तरुण मतदारांशी केवळ संवाद साधून भागणार नाही तर पोलिंग बुथ पर्यंत त्यांना खेचून आणायची चुंबकीय शक्ती राजकीय पक्षांना निर्माण करावी लागणार आहे.सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीने 1996, 1998, 1999 आणि 2004 मध्ये मतदानांनतर केलेल्या सर्वेक्षणात 18-25 वयोगटातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी सातत्याने मतदान केलंय. पण 18-25 वयोगटातल्या मतदारांच्या तुलनेत 26-35, 36-45, 46-55 वयोगटातील मतदारांनी सातत्याने कमी मतदान केल्याचं आढळून आलंय. पण 46-55 मध्यमवयोगटात मतदानाचं प्रमाण सर्वाधिक आढळून आलंय. त्याचप्रमाणे 56 पेक्षा जास्त असलेल्या वयोगटात परत मतदानाच्या प्रमाणात घट दिसून आली. 1991 सालच्या निवडणुकीत 58 टक्के मतदान झालं होतं, तर 18-25 वयोगटात
मतदानाचं प्रमाण होतं 54.1 टक्के. सर्वाधिक मतदान केलं होतं 46-55 वयोगटातल्या मतदारांनी... त्याचं प्रमाण होतं 61.2 टक्के.2004 सालच्या निवडणुकीत 18-25 वयोगटातल्या मतदारांनी 54.7 टक्के मतदान केलं तर एकूण मतदानाची सरासरी होती 58.1 टक्के. या निवडणुकीतही 46-55 वयोगटातल्या मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं होतं प्रमाण होतं 62.6 टक्के. एकंदरीत राजकीय पक्षांना तरुण मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करायला बरेच प्रयास करावे लागणार आहेत आणि राजकीय प्रवाहात आणि निवडणूक प्रक्रियेत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी त्यांच्या भाषेतच संवाद साधावा लागणार आहे. आता ही कसरत राजकीय पक्ष यशस्वीपणे कशी पार पडतात ते पाहाणं निश्चितच मनोरंजक ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा