गुरुवार, २६ मार्च, २००९

पालघर नगरपरिषदेतील सत्ता शिवसेनेनं गमावली

पालघर नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं सत्ता गमावली असून पालघर एकता परिषद इथं सत्तेवर आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी आणि बहुजन आघाडी या सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेविरोधात लढण्यासाठी पालघर एकता परिषदेची स्थापना केली होती. या आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकून काठावरचे बहुमत प्राप्त करत सत्ता मिळवली. शिवसेनेला १२ जागा मिळाल्या. केवळ एका जागेमुळे शिवसेनेला सत्ता हातातून गमवावी लागली. मागच्या निवडणुकीत शिवसेनेला १७ जागा मिळाल्या होत्या. पालघर नगरपरिषदेची सत्ता जरी पालघर एकता परिषदेला मिळाली असली तरी नगराध्यक्षपदी शिवसेनेचाच नगरसेवक बसणार आहे. कारण यावेळी पालघर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसुचित जातीतील महिलेसाठी राखीव आहे. आणि या प्रवर्गातील निवडून आलेल्या तीनही महिला शिवसेनेच्याच तिकीटावर निवडून आल्या आहेत. त्यामुळे अन्न आहे पण चावायला दातच नाहीत अशी अवस्था पालघर एकता परिषदेची झाली आहे.