वेगवेगळ्या व्यवसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी इंटर्नशिपकरता नेहमीच बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्राधान्य देतात, मात्र एचआर क़ॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. एचआर कॉलेजचे 50 विद्यार्थी एक
एप्रिल पासून खासदार मिलिंद देवरांच्या निवडणूक प्रचारात इंटर्नशीप करणार आहेत. निवडणूक प्रचार काय असतो याची कल्पना या विद्यार्थ्यांना इंटर्नशीपमुळे येईल. अश्या प्रकारची संधी आमच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा मिळत आहे असं कॉलेजच्या प्राचार्या इंदू सहानी यांनी सांगितलं. देवरा हे आदर्श उमेदवार असल्याचं मत गोविंद शोरेवाला या विद्यार्थाचे व्यक्त केलंय. दक्षिण मुंबई मतदारसंघाच्या प्रतिनिधीला आवश्यक असणारे सर्व नेतृत्व गुण त्यांच्यात असल्याचं शोरेवालाला वाटतं. एका प्रकल्पाच्या निमित्ताने आपण देवरांच्या संपर्कात आलो तेव्हा त्यांच्याशी तरुण पिढी विविध स्तरावर सहज संवाद साधू शकते हे जाणवलं. ओबामांच्या प्रचारापासून स्फूर्ती घेत तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर, तसंच तळागाळात व्यापक संपर्क साधण्याचं निश्चित करण्यात आलंय. ओबामांच्या प्रचारात इंटरनेट हे सर्वात ताकदीचं माध्यम म्हणून सर्वांना परिचीत झालं तेच वापरात आणण्यात येणार आहे. विद्यार्थी प्रचारासाठी घरोघर जाणार आहेत तसंच चर्चा, व्यक्तिगत संपर्क, एसएमएस आणि फोन या माध्यमातून मतदारांचे मन वळवण्यात येणार आहे. शिवडी ते कुलाबा दरम्यान घरोघरी संपर्क साधण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं म्हणजे ही संधी पाच वर्षात एकदाच येते, त्यामुळे इंटर्नशीपसाठी देवरांच्या प्रचार मोहिमेची निवड करण्यात आली. व्यवस्था बदलण्यासाठी केवळ टीका करुन काहीच साध्य होत नाही त्याकरता तरुणांचा सहभाग आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा